जळगाव जिल्हा न्यायालयाचा निर्णय
जामनेर तालुक्यातील नांद्रा येथे घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : गावात वाद घालणाऱ्या मुलाला पित्याने रागावत कानशिलात मारली. तसेच, त्याच्या मोठ्या भावानेदेखील समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याबाबत राग मनात ठेऊन वडिल व मोठ्या भावाचा लहान भावाने खून केल्याची घटना साडेतीन वर्षांपूर्वी जामनेर तालुक्यातील नांद्रा येथे घडली होती. याप्रकरणी आता जळगाव जिल्हा न्यायालयाने निर्णय दिला असून आरोपीला दोषी सिद्ध करीत ५ हजारांचा दंड व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
जामनेर तालुक्यातील नांद्रा येथे ११ जुलै २०२० रोजी आरोपी निलेश आनंदा पाटील याचे गावातील पांडूरंग हिरामण सोनवणे यांच्याशी वाद झाला. हा वाद झाल्यानंतर निलेशचे वडिल आनंदा कडू पाटील व निलेशचा मोठा भाऊ महेंद्र पाटील यांनी निलेशला समजावण्याच्या प्रयत्न केला.वडिलांनी निलेशला यावेळी २-४ चापटा देखील मारल्या, त्याला समजावून घरी आणले. त्या रात्री ११ वाजता निलेशची आई सरस्वतीबाई यांनी ‘भैया पळ’ असा आवाज दिला. त्यानंतर घरातील एका खोलीत झोपलेल्या महेंद्र व त्यांची पत्नी अश्विनीने दरवाजा उघडला. पाहतो तर, निलेशने त्याच्या वडिलांचे तोंड दाबले होते व त्याच्या वडिलांच्या तोंडातुन रक्त निघत होते. निलेशच्या हातात चाकू होता, म्हणुन वडिलांना वाचविण्यासाठी महेंद्र निलेशला धरण्यास गेला असता निलेशने तोच चाकू त्याचा भाऊ महेंद्रच्या पोटात खुपसला. त्यामुळे महेंद्रपण खाली पडला आणि तोच चाकू घेऊन निलेश वहिनी अश्विनीच्या अंगावर धावून गेला.
तेव्हा अश्विनीने घराचा दरवाजा आतुन लावुन घेतल्याने ती वाचली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पाटील दिनेश कु-हाडे, अरुण शिंदे, प्रकाश पाटील व इतर लोक आले. त्यांनी ॲम्बुलन्स बोलाऊन निलेशच्या वडिलास व भावास पहुरच्या शासकीय रुग्णालयात आणले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मयत घोषीत केले. त्यानंतर मयत महेंद्रची पत्नी अश्विनीच्या फिर्यादीवरून पहुर पोलीस स्टेशनला निलेशच्या विरुध्द दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पती व मोठ्या मुलाचा झालेला खून व खून करणारा लहान मुलगा, अशा व्दिधा मनस्थितीत असलेल्या आई सरस्वतीबाई पाटील यांची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली.
सरस्वतीबाई पाटील यांनी न्यायालयात, झालेली घटना सविस्तर सांगितली. त्यांच्यासह इतर १३ जणांच्या साक्ष महत्याच्या ठरल्या. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यु.एस.एम. शेख यांच्या न्यायालयात चालला. फिर्यादीपक्षा तर्फे आलेल्या एकूण १३ साक्षीदार जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी तपासले. सरकारपक्षातर्फे सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले. युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयासमोर आलेला पुरवा लक्षात घेवून न्यायालयाने आरोपी निलेश पाटील याला कलम ३०२ अन्वये आरोपी जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास ६ महीने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.
मयत मोठा भाऊ महेंद्र पाटील हा जळगावला एका चटई कंपनीत कामाला होता व तो कुसुंबा येथे राहत होता व चार ते महिन्यातून तो घरी नांद्रा येथे जात होता. तर आरोपी निलेश हा ट्रॅव्हल कंपनीत चालक म्हणुन काम करत होता व कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे त्याची नोकरी सुटली होती आणि महेंद्र नेमका त्याच दिवशी नांद्रा येथे गेला आणि या गुन्ह्यात दुर्दैवाने भावाच्या हाताने खुन होवून त्याचा मृत्यु झाला.