जळगाव जिल्हा न्यायालयाचा निर्णय
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन सख्ख्या चुलत बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम करावास व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा बुधवारी दि. २२ मे रोजी दुपारी ३ वाजता सुनावली आहे.
राज संतोष कोळी (वय-१९ रा. जळगाव खुर्द, ता. जळगाव) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील एका गावात आरोपी राज कोळी हा वास्तव्याला आहे. २० ऑक्टोबर २०२१ रोजी ६ वर्षीय व ७ वर्षीय या दोन सख्ख्या चुलत बहिणींना राज कोळी याने त्याच्या घरी बोलवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपीवर जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला. या खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यात दोन्ही पीडित अल्पवयीन मुली आणि त्यांची आई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायमुर्ती एस. एन. राजूरकर यांनी राज संतोष कोळी याला दोषी ठरवत वेगवेगळ्या कलमान्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.