जळगाव तालुक्यातील वडनगरी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडनगरी येथे किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात फावडा मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन अरुण पाटील (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगल अंबादास मोरे (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडनगरी गावामध्ये डॉ. आंबेडकर नगर चौकात बुधवारी दि. २ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हि घटना घडली आहे. मंगळवारी दि. १ एप्रिल रोजी फिर्यादी नितीन पाटील आणि मंगल मोरे यांनी गावातील जगन दौलत चौधरी यांची कुट्टी भरण्याचे काम केले होते. ते काम करून परत जात असताना मंगल ने त्यांना सांगितले की, तू आज कमी काम केले आहे. मी तुला मारेन असे म्हणून निघून गेला होता.
दरम्यान, बुधवारी दि. २ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता डॉ. आंबेडकर नगरात फिर्यादी नितीन पाटील व त्याच्यासोबत लखन चोरमल, संजय खाटीक, प्रमोद सोनवणे असे बसलेले असताना त्या ठिकाणी मंगल अंबादास मोरे हा आला. त्याने हातातील पावडा घेऊन नितीन पाटील यांच्या डोक्यात मागील बाजूस मारून जखमी केले व निघून गेला. नितीन पाटील याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.