जळगाव शहरातील तांबापुर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तांबापूरा येथील एका ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी २ जानेवारी रोजी समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सतिष बाबुराव ससाणे (वय ४२, रा. तांबापुरा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. सतिष ससाणे हे तांबापुरा येथे पत्नी, दोन मुले आणि मुलगीसह वास्तव्यास होते. हातमजुरी करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ते एका दुर्धर आजारापासून त्रस्त होते. मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी पत्नी कामावर तर मुले बाहेर गेले होते. त्यामुळे ते घरी एकटेच होते. सकाळी पुतण्याला त्यांनी नाश्ता घेण्यासाठी पाठविले.
याच दरम्यान त्यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. साडेदहा वाजेच्या सुमारास पुतण्या नाश्ता घेवून आल्यावर त्याला काका सतिष ससाणे यांनी गळफास घेतल्याचे दिसताच, हंबरडा फोडला. परिसरातील नागरीकांनी धाव घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.