जळगाव शहरात समता नगर येथील घटना, कुटुंबियांसह मित्र शोकाकुल
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील समतानगर भागात सोमवारी सकाळी १० वाजता २० वर्षीय तरुणाचा झोपेतच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शासकीय रुग्णालयात कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. तर नातेवाईकांसह मित्रांनादेखील मोठा धक्का बसला आहे. या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सागर अशोक नन्नवरे (वय २०, रा. समता नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. सागरच्या पश्चात आई सुनीता, वडील अशोक आणि बहीण असा परिवार आहे. सागर नन्नवरे हा पेंटिंगचे काम करत तर त्याचे आई-वडील हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. (केसीएन)रविवारी रात्री तो नेहमीप्रमाणे जेवण करून झोपला. सोमवारी सकाळी त्याची आई सुनीता नन्नवरे कामावर गेल्यानंतर सागर झोपेतून उठला. कॉलनीत तो फिरून आला. काही मित्रांसोबत वेळ घालवला. त्यानंतर तो पुन्हा घरी येऊन झोपी गेला. सकाळी १० वाजता सुनीता नन्नवरे कामावरून घरी आल्या. मुलाला कामाला उशीर होत असल्याचे सांगत त्यांनी सागरला उठवण्यासाठी हाक मारली. मात्र, सागरने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
आई जवळ गेली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने त्या घाबरल्या. त्यांनी तात्काळ बाहेर येऊन सागरच्या मित्रांना याची माहिती दिली. सागरच्या मित्रांनी कोणताही वेळ न घालवता त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून सागरला मृत घोषित केले.(केसीएन)एकुलत्या एक मुलाच्या अकस्मात मृत्यूने आई-वडिलांना मोठा धक्का बसला. सागरचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. सागरच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच समजून येणार आहे. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.