भुसावळ तालुक्यातील कन्हाळा येथील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कन्हाळा गावातील १६ वर्षीय तरुणाचे खडका येथे अपहरण करून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना अडवून उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तींनी त्याला हॉटेलसमोर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून झुडपांमध्ये नेले. तेथे चामडी पट्टा व फायटरने अमानुष मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तत्काळ भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि मेंदूवर गंभीर मार लागला असून त्याची प्रकृती नाजूक आहे. घटनेनंतर कन्हाळा ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद गवळी यांनी संताप व्यक्त करीत संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज प्रशासनाकडे पोहोचला असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.