अमळनेर शहरात घडली घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरातील एका तरूणाचा मोबाईल हॅक करून आलेल्या ओटीपीच्या माध्यमातून परस्पर बँक खात्यातून व्यवहार करून १ लाख रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक प्रकार दि. ७ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता घडला आहे. या प्रकरणी गुरूवारी दि. ९ जानेवारी रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावेश गणेश पाठक (वय ३२ रा. शिवशक्ती चौक, अमळनेर) हा तरूण पिठाची गिरणी चालवून तो उदरनिर्वाह करतो. मंगळवारी ७ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास भावेश हा पिठाच्या गिरणीत काम करत असतांना त्याला मोबाईलवर अनेक मॅसेजेस असलेले दिसून आले. त्यात अज्ञात व्यक्तीने त्याचा मोबाईल हॅक करून आलेल्या ओटीपीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून परस्पररित्या १ लाख रूपये काढून फसवणूक केल्याचे दिसून आले. दरम्यान भावेशने बँकेत जावून बँक खाते फ्रीझ केले. त्यानंतर भावेशने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी ९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात मोबाईल धारकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे हे करीत आहे.