पारोळा तालुक्यातील टोळी येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील टोळी येथील ३६ वर्षीय कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने काहीतरी विषारी औषध घेऊन त्याच्या स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना आज दि. १७ रोजी सकाळी १० वाजता घडली.
टोळी येथील शेतकरी विजय रामचंद्र पाटील (वय ३६) असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ते माजी सरपंच स्वाती विजय पाटील यांचे पती होत. त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी आई असा परिवार आहे. रविवारी दि. १७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या टोळी शिवारातील स्वतःच्या शेत गट क्रमांक ८६/१ मध्ये काहीतरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला.
त्यांना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं असता त्यांचा उपचारादरम्यान सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. त्यांच्यावर बँकेचे व विकास सोसायटीचे कर्ज असल्याने ते नैराश्यात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.