भुसावळ तालुक्यातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरातील तापी नदीच्या पात्रात गुरुवार दिनांक १७ रोजी रात्री बांभोरी येथील तरुणाने तापी पुलावरून रात्री १० वाजता उडी घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला होता. गेल्या दोन दिवसांपासून बचाव पथकाकडून तरुणाचा शोध सुरू असताना शनिवारी घटनेच्या तिसर्या दिवशी जुगादेवी परिसरात नदी पात्रात अविनाशचा मृतदेह सकाळी ११ वाजता पथकास मिळाला.
अविनाश सोनवणे (वय २४) असे मयत युवकाचे नाव आहे.गुरुवार १७ रोजी रात्री बांभोरी येथील युवक अविनाश मोटरसायकलने एक महिला व युवतीसोबत तापी नदीच्या पुलावर आला. यावेळी त्यांच्यात काही वाद झाल्यानंतर तरुणाने थेट पूलावरून रात्रीच्या अंधारात तापी नदीत उडी मारली. यामुळे दोन्ही महिला ओरडू लागल्यात. यामुळे रस्त्याने येणार्या-जाणार्यांनी थांबून चौकशी केली.
यावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे व त्यांच्या सहकार्यांनी तापी नदी गाठली. अविनाश याच्या घरी माहिती देण्यात आल्यानंतर परिवारातील भाऊ, वडील, काका यांच्यासह मित्र परिवाराने धाव घेतली. गुरुवारी रात्रीपासूनच शोध मोहिम सुरू करण्यात आली. शनिवारी बचाव पथकाला व पोलिसांना जुगादेवी मंदिराकडील नदीत फुगलेल्या अवस्थेत अविनाशचा मृतदेह आढळला.
पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, दीपक शेवरे, अ.रज्जाक यांनी पंचनामा केला. मृत अविनाशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ट्रामा केअर सेंटरला होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद करीत आहे.