एरंडोल पोलीस स्टेशनची कामगिरी
एरंडोल (प्रतिनिधी) : शहरातील महाजन नगर परिसरात झालेल्या घरफोडीतील संशयित आरोपीला अवघ्या १५ दिवसात एरंडोल पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाजन नगर येथे दि .८ मे रोजी मेहरबान नाथ सिदुनाथ सोळंकी (शिल्पकार) यांच्या राहत्या घरी घरफोडी होऊन यात २ लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेला होता. त्यात तीन मोबाईल व रोकडचा समावेश होता. यावेळी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल,पो.ना.अकील मुजावर,पो.शी.आकाश शिंपी,पंकज पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणावरून गुन्हा उघड केला आहे.
त्यातून संशयित आरोपीचा एक क्रमांक चालू झाल्याचे निष्पन्न करुन कुवरसिंग गंगाराम खर्चे (वय २३ रा. गुडा शहापुर, ता. सेंधवा जि.बडवानी, म प्र.) या संशयित आरोपीचा शोध घेऊन त्यास दि.२४ मे रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथुन ताब्यात घेतले. गुन्ह्यातील चोरी झालेल्या तीन मोबाईल पैकी एक विवो कंपनीचा अंदाजे २० हजार रुपये किमतीचा हस्तगत केला व ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून सदर गुन्ह्यात सुनील बारेला आणि कालु बारेला हे अजून दोन संशयित सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून ते फरार आहेत. कुवरसिंग गंगाराम खर्चे यास २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.