जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – येथील पंचायत समिती, जळगाव शिक्षण विभागातर्फे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना आनंद मिळावा हा या उपक्रमाचा हेतू होता. या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या विटनेरच्या विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला.
प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील आणि गट विकास अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाळांमध्ये टमाटे, वांगी, भेंडी, गिलके, कढीपत्ता, कोथिंबीर, काकडी इत्यादी भाजीपाल्याची रोपे लावून त्याचा वापर शालेय पोषण आहारात केला जात असल्याचे दिसून आले. स्पर्धेच्या परीक्षणासाठी प्रभारी गट शिक्षणाधिकारी खलील शेख, प्रभारी अधीक्षक विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी सरला पाटील, जितेंद्र चिंचोले, केंद्र प्रमुख अनिता परमार, अफशा खान, कैलास पवार यांनी शाळांना भेटी देऊन पाहणी केली.
जळगाव तालुकास्तरीय शालेय परसबाग स्पर्धेच्या निकालात प्रथम क्रमांक – जिल्हा परिषद शाळा, विटनेर, द्वितीय क्रमांक -जिल्हा परिषद शाळा, नांद्रे बु यांनी तर तृतीय क्रमांक -जिल्हा परिषद शाळा, वराड यांनी मिळविला. प्रोत्साहनपर चतुर्थ क्रमांक – जिल्हा परिषद शाळा, पिलखेडे, पाचवा क्रमांक – जिल्हा परिषद शाळा, जळगाव खु, सहावा क्रमांक -जिल्हा परिषद शाळा,अमोदे खुर्द यांनी मिळविला.