जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने या अभियानांतर्गत विविध स्तरांवर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. दिनांक १७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या शिबिरांना जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.
भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून करण्यात आली असून समारोप महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी होणार आहे. महिलांचे आरोग्य, कुटुंबाचे सशक्तीकरण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य तपासण्या या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
शिबिरांची आकडेवारी
नियमित शिबिरे आयोजित : १५५६
विशेष शिबिरे आयोजित : १६९
एकूण नागरिकांचा सहभाग : २ लाख ४८ हजार ४३८
लाभार्थींची तपशीलवार विभागणी
पुरुष लाभार्थी : ४७ हजार ४९९
महिला लाभार्थी : २ लाख ९३९
गर्भवती माता तपासणी : ६ हजार ६६५
लसीकरण केलेले बालक व लाभार्थी : ९ हजार ४९१
एनसीडी उच्च रक्तदाब तपासणी : ५३ हजार २७७
एनसीडी मधुमेह तपासणी : ५२ हजार ६०७
शस्त्रक्रिया लाभार्थी : २३६
आयुष्मान गोल्डन कार्ड वितरण : १ लाख ७ हजार २४३
रक्तदान शिबिरातील रक्तदाते : १९२
अभियानातील विशेष तपासण्या व उपक्रम
गरोदर माता तपासणी
बालकांचे व गरोदर मातेचे लसीकरण सत्रे
संसर्गजन्य आजार तपासणी
क्षयरोग तपासणी
ॲनिमिया तपासणी
सिकलसेल आजार तपासणी
नेत्र तपासणी (डोळ्यांचे आजार तपासणी व मोतीबिंदू निदान)
कर्करोग तपासणी (स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, तसेच इतर तपासण्या)
रक्तदान शिबिरे
आयुष्मान भारत गोल्डन कार्ड वितरण
अभियानाचे महत्त्व
या अभियानामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकांच्या आरोग्य तपासण्या झाल्या. महिलांच्या आरोग्य तपासण्या, गर्भवती मातांची निगा व बालकांचे लसीकरण या उपक्रमांतर्गत बळकटीस आले. एनसीडी म्हणजेच उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणीमुळे नागरिकांमध्ये रोग ओळख आणि नियंत्रणाबाबत जागरूकता वाढली. पीएम-जय योजना कार्डांचे मोठ्या प्रमाणावर वितरण झाल्याने गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.रक्तदान उपक्रमांमुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांचा साठा वाढीस लागला.
जिल्हा आरोग्य विभागाचा प्रभावी अंमल
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आशा, अंगणवाडी सेविका तसेच स्वयंसेवी संस्था यांचा मोलाचा सहभाग राहिला. आरोग्यसेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आरोग्य विभागाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकारामुळे २ लाख ४८ हजारांहून अधिक नागरिकांना आरोग्य सेवा पोहोचल्या हे या अभियानाचे विशेष यश ठरले आहे.