नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारने संसदेत मंजुर करून घेतलेल्या शेती विषयक तिन्ही विधेयकांवर राष्ट्रपतींनी आज स्वाक्षरी केली. त्यमुळे या तिन्ही विधेयकांचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. विरोधी पक्षांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रपतींची भेट घेऊन या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती विधेयके संसदेला परत पाठवून देण्याची सुचना केली होती.
राज्यसभेत प्रत्यक्ष मतदान न घेताच सरकारने आवाजी मतदानाने ही विधेयके संमत करून घेतल्याचा विरोधकांचा दावा आहे. विरोधकांनी या विधेयकांवर मतदानाची मागणी करूनही सरकारने ती मागणी अमान्य करून लोकशाहीची हत्या केली आहे असा आरोप करीत विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ माजवला होंता.
या गदारोळाचे तीव्र पडसाद अन्यत्रही उमटले होते. तसेच शेती विषयक विधेयकांच्या बाबतीत शेतकऱ्यांचा आंदोलनाचा देशभर भडका उडाला असून अजूनही देशाच्या अनेक भागात या विधेयकांवरून आंदोलने सुरू असतानाच राष्ट्रपतींनी मात्र या विधेयकांना त्याच्यावर शिक्कामोर्तबही केले आहे.