चैन्नई (वृत्तसंस्था ) ;- दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलापती विजयने राजकारणात प्रवेश केला आहे. नुकतेच त्याने त्याच्या नवीन पक्षाच्या अधिकृत झेंड्याचे अनावरण केले आहे. त्याच्या पक्षाचे नाव ‘तमिझागा वेत्री कषगम’ असे आहे. त्याचा अर्थ ‘तामिळनाडू विजय पार्टी’ असा होतो. या वर्षाच्या सुरुवातीला, फेब्रुवारीमध्ये विजयने आपला नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती.विजयच्या नवीन पक्षाचा झेंडा पिवळ्या आणि लाल रंगाचा आहे. ज्यात दोन्ही बाजूला हत्ती आणि मध्यभागी मोर आहे.
त्यानंतर आज चेन्नईच्या पायनूर येथील पक्षाच्या मुख्यालयात एका भव्य कार्यक्रमात पक्षाचा ध्वज आणि प्रतीक अधिकृतपणे लाँच केले. यावेळी पक्षाचे राष्ट्रगीतही सादर करण्यात आले. फ्लॅग लॉन्च इव्हेंटमध्ये, विजय मेळाव्याला संबोधित करताना पक्ष लवकरच एक मेगा कॉन्फरन्स आयोजित करेल, जिथे ते TVK ची तत्त्वे आणि उद्दिष्टे सांगतील, असे स्पष्ट केले. यापूर्वी ते स्वतःसाठी जगले असले तरी आता त्यांना तामिळनाडूच्या लोकांसाठी आपले जीवन समर्पित करायचे आहे यावर त्यांनी भर दिला.
पार्टीच्या चिन्हाचे अनावरण करण्याआधी विजय थलपतीने शपथ घेतली. त्यानं म्हटलं की ‘आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले आणि ज्यांनी बलिदान दिले त्या सैनिकांचे आम्ही नेहमीच कौतुक करू. तमिळनाडूच्या भूमीतील आपल्या लोकांच्या हक्कांसाठी अथकपणे लढणाऱ्या त्या अगणित सैनिकांचे योगदान आम्ही सदैव लक्षात ठेवू. जात, धर्म, लिंग, जन्मस्थान या नावावरचा भेदभाव मी दूर करेन. मी लोकांमध्ये जागृती निर्माण करेन आणि सर्वांना समान संधी आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.’ असे तो म्हणाला .