तुरुंग महानिरीक्षकांच्या माहितीतून वास्तव उघड ; जळगावच्या कैद्यांना टीव्ही, वॉशिंग मशीन, नातेवाईकांशी बोलण्याची सुविधा
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा उपकारागृहात निम्म्या मनुष्यबळावर क्षमतेपेक्षा दुप्पट कैद्यांचा भार आला आहे. त्यामुळे कारागृहांची अंतर्गत व बाहेरील सुरक्षा भेदत मोठे गुन्हे घडत आहेत. जळगावच नाही तर संपूर्ण राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट बंदिवान आहेत. राज्यभरात गुन्हेगारी वाढल्यामुळे आता कारागृहात बंदी ठेवायला अडचणी येत असल्याचे वास्तव प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या माहितीतून उघड झाले आहे.
प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी जळगावात कारागृह तपासणीवेळी पत्रकारांना माहिती दिली. कारागृहे हे यातनागृहे नसून ते सुधारगृहे आहेत, या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत. नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे आणि एक महिला कारागृह आहेत. या सर्व कारागृहांची एकूण क्षमता २४ हजार ७२२ कैद्यांची आहे. असे असतानाही प्रत्येक कारागृहात क्षमतेपेक्षा जास्तीचे बंदिवान आहेत. एकट्या जळगावात २०० क्षमतेच्या कारागृहात ४०० पेक्षा अधिक बंदी आहेत.
कैद्यांच्या पुनर्वसन आणि सुधार कार्यक्रमांतर्गत कारागृहात अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरवल्या जातात. जेणेकरून कैद्यांची मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि त्यातूनच गुन्हे करण्याची प्रवृत्ती टाळून तो सुधारणेच्या मार्गाचा अवलंब करेल. कारागृहात कैद्यांसाठी ॲलेजिक टेलिफोनिक सुविधा उपलब्ध असून, कुठलाही बंदिवान निश्चित चार लोकांशी त्यात आई-वडील, वकील आणि नातेवाइकांशी बोलू शकतो. व्हिडिओ कॉलिंगची सेवाही सुरू झाली आहे. आठवड्यात एकदा ५ कॉल त्याला करता येतात तर महिन्याला २० कॉल आहेत. तर महिन्याभरात त्याला १०० मिनिटे बोलता येते.
ई-प्रिझन सुविधेमध्ये राज्यातील बहुतांश कारागृहांमध्ये आता क्युऑक्स सिस्टिम कार्यान्वित झाली आहे. कैद्याच्या थम्ब इम्प्रेशनद्वारे त्याला त्याच्या केसेबाबत संपूर्ण अपडेट माहिती स्क्रीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक बॅरेकमध्ये मनोरंजनासाठी टीव्ही लावण्यात आला असून, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनही देण्यात आले आहे. जेणेकरून स्वच्छ कपडे कैद्यांना परिधान केल्याने आजारांची लागण होणार नाही. कैद्यांच्या खटल्याच्या कामकाजासाठी न्यायालयात ने-आण करण्यासाठी नेहमीच गार्ड मिळत नसल्याची तक्रार असायची. आता राज्यात बहुतांश कारागृहात व्हिडिओ कॉलिंगद्वारे संशयितांना न्यायालया समक्ष हजर करून त्याद्वारे कामकाजात सहभागी करण्यात येते. जळगाव कारागृहात असे दहा युनिटी सद्यःस्थितीत सुरू आहेत.
राज्यातील कारागृहांमध्ये कर्मचारी तुटवडा जाणवत असल्याने रिक्त पदांवर भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. शिपाई भरतीसाठी एक हजार ८०० जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. भरतीनंतर नवे कर्मचारी आल्यावर थोडा भार हलका होण्याची शक्यता आहे. जळगाव कारागृहात २३६ पैकी २०० सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेले आहेत. भुसावळ तालुक्यात खेडी भागात ३४९ क्षमतेचे वर्ग १ चे नवीन कारागृह प्रस्तावित असून त्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा सुरु असल्याचेही डॉ. सुपेकर म्हणाले.