मेहुणबारे पोलीस स्टेशनची कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी) : वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक म्हशी निर्दयीपणे कोंबून त्यांची वाहतूक करताना मिळून आल्यावरून मेहुणबारे पोलिसांनी कारवाई केली आहे. एकूण १३ म्हशींची सुटका करण्यात आली आहे. मेहुणबारे पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
चाळीसगाव बायपासवर एक टाटा आयशर गाडी संशयास्पद अवस्थेत मालेगाव रस्त्याने जाताना काही नागरिकांना दिसली. त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करून वाहन साकूर फाटा येथे थांबवून मेहुणबारे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन (एमएच ४३ इ ५६३०) या वाहनाची तपासणी केली. त्यात लहान मोठ्या अशा १३ म्हशी आढळून आल्या.
या म्हशी अत्यंत निर्दयीपणे वाहनात कोंबल्याचे आढळून आले. वाहनचालकाकडे गुरे खरेदी-विक्रीचा कुठलाही परवाना नव्हता. पोलिसांनी १३ म्हशी आणि वाहन, असा सुमारे ४ लाख ४२ हजारांचा ऐवज जप्त केला. याबाबत किसन झिपरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात चालक आबिदखान अकमलखान कुरेशी (रा. चाळीसगाव) व क्लीनर आसिफखान आयुबखान (रा. मालेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एएसआय मिलिंद शिंदे तपास करीत आहेत.