मुक्ताईनगर तालुक्यात चोऱ्यांचे वाढते प्रमाण
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सुकळी परिसरात पशुधनाच्या चोरीची चौथी घटना काल बुधवारी रात्री घडली. त्यात सुकळी येथील गुराख्याच्या सहा शेळ्या अज्ञात चोरट्यांनी शेळ्यांच्या वाड्यातून चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे सुकळी परिसरातील नागरिक तसेच पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे यापूर्वी विश्वनाथ सोनवणे यांच्या किराणा दुकानातून रोकड तसेच किराणा मालाची चोरी झाली होती. त्या अगोदर सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात गॅस हंड्या व गॅस शेगडी चोरून नेल्याची घटना घडली होती. तसेच अनेक ठिकाणी पशुधनाची चोरी झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गही हैराण झाला आहे. दि.२५ सप्टेंबरच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी नामदेव तुकाराम इंगळे यांच्या बकऱ्यांच्या वाड्यांमधून ६ शेळ्यांची चोरी केली. त्यात ५ बकऱ्या व १ बोकड यांचा समावेश असून सुकळी येथे यापूर्वी देखील चार- पाच दिवसांपूर्वी धनलाल मंगा राठोड यांच्या दोन शेळ्या मध्यरात्रीत सूर्य गेलेले आहेत.
तसेच येथील सुनील प्रताप कोचुरे यांच्या देखील चार शेळ्या चार-पाच दिवसांपूर्वीच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नामदेव इंगळे यांच्या मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय पठार हे करीत आहेत. सुकळी परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी केली जात आहे.