पाचोरा येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : राज्य शासनाने, प्रवाशांना घेऊन जाणारी बस चालवीत असताना चालकांना मोबाईलवर बोलण्यास बंदी घातली आहे. तरीही अनेक चालक हे सूचनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. अशाच एका चालकाला चौकशीअंती एस.टी.महामंडळाने निलंबित केल्याची घटना उघड झाली आहे. या वृत्ताला विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दुजोरा दिला आहे.
पाचोरा आगारातील चालक गणेश ठाकरे याला एस.टी. महामंडळाने निलंबित केले आहे. दि. २७ मे रोजी सकाळी ७:३० वाजता पाचोरा आगारातून पाचोऱ्याहून जळगावकडे जाणारी बस क्रमांक – एम.एच. १४ बी.टी. २६३४ ह्या बसचा चालक गणेश ठाकरे हा बस चालवत होता. त्याच वेळेला तो मोबाइलवरदेखील बोलत होता. त्याला काही प्रवाशांनी हटकले.
त्यानंतर त्याने प्रवासी आणि वाहक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. आणि प्रवाशांशी हुज्जत घातली. तो मोबाईलवर बोलत असतानाचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. त्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पांडे यांनी केली होती. ठाकरे याने तब्बल २० मिनिटे फोनवर संभाषण केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यानंतर मुंबई कार्यालयाने जळगाव येथील विभाग नियंत्रकांना सदर चालकाची चौकशी करून कारवाई करण्याचे सूचित केले होते.
त्यानुसार त्याची चौकशी केली असता तो दोषी आढळून आला. त्यानुसार व प्रवाशाच्या तक्रारीनंतर चालकाला एसटी महामंडळाकडून निलंबित करण्यात आले आहे.