नोबेल पुरस्कार विजेत्या तज्ज्ञाचा धक्कादायक दावा
नवी दिल्ली – एकीकडे जगभरातील अनेक देशांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर देत जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पण त्याचवेळी दुसरीकडे कोरोनाचे नवीन म्युटेटेड म्हणजेच जणुकीय बदल असणारे विषाणू अधिक घातक ठरत आहेत. अशातच एक धक्कादायक दावा फ्रान्समधील एका नोबेल पुरस्कार विजेत्या प्राध्यापकाने केला आहे. एका मुलाखतीमध्ये प्राध्यापक ल्यूक मॉन्टॅग्नियर यांनी कोरोना प्रतिबंधक लसींमुळेच अधिक धोकादायक आणि रचनात्मक दृष्ट्या शक्तीशाली होत असल्याचे म्हटले आहे. अधिक घातक ठरणारे कोरोनाचे नव नवीन प्रकार लसीकरणामुळेच समोर येत असल्याचा दावाही मॉन्टॅग्नियर यांनी केला आहे.
मे महिन्याच्या सुरुवातील एका फ्रेंच पत्रकाराला मॉन्टॅग्नियर यांनी विशेष मुलाखत दिली. त्यांनी यावेळी साथरोग तज्ज्ञांना लसींसंदर्भातील दाव्यांबद्दल पूर्ण कल्पना असली तरी ते शांत असल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मॉन्टॅग्नियर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना, कोरोनाचा प्रसार लसींमुळे थांबत नाही तर त्याचा उलट परिणाम होऊन विषाणू अधिक शक्तीशाली होतात. कोरोनाचे नवीन विषाणू हे लसीकरणामुळेच आधीच्या विषाणूंच्या तुलनेत अधिक नुकसान करत असल्याचा दावा केला आहे.
मॉन्टॅग्नियर हे फ्रान्समधील प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट म्हणजेच साथरोगतज्ज्ञ आहेत. २००८ साली त्यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळेच त्यांनी व्यक्त केलेली शंका आणि दावा सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पियरे बर्नेरियास या वरिष्ठ पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोरोनासंदर्भात अनेक गोष्टींबद्दल भाष्य केले होते. सोशल मीडियावर या मुलाखतीची व्हिडीओ क्लिप सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीचे अमेरिकेतील रेअर फाऊंडेशनने फ्रेंच भाषेतील भाषांतर केले आहे.