जळगाव :- भुसावळ नगरपालिकेचे भाजप नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचननाम्यानुसार विकास कामे होत नसल्याने स्वतःची किडनी विकून कामे करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे महेंद्र सिंग ठाकूर हे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आहे (
‘नागरिकांना शुद्ध पाणी आणि चांगले रस्ते तयार करण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रशासन आणि नगराध्यक्ष यांच्याशी वारंवार चर्चा करुनदेखील कुठलीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे माझ्या प्रभागात जो कोणी विकास कामे करुन देईल त्याला मोबदल्यात मी किडनी देण्यास तयार आहे’, असं नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर म्हणाले
भुसावळ नगरपालिकेची 2016 साली निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत भाजपचे 47 पैकी 28 नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महेंद्र सिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. यावेळी एकनाथ खडसे यांनी प्रचारसभेत रस्ते आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या साडेचार वर्षात एकनाथ खडसे यांचं हे आश्वासन पूर्ण होऊ न शकल्याने महेंद्र सिंग ठाकूर नाराज आहेत.
भाजपने जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या कामांपैकी 90 टक्के कामं झाल्याचा दावा महेंद्र सिंग ठाकूर यांनी केला आहे. मात्र, रस्ते आणि शुद्ध पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहीला, असं महेंद्र सिंग ठाकूर म्हणाले. रस्त्यांसाठी बऱ्याचदा टेंडर निघाले, निधी आला, मात्र सर्व निधी परत गेला, असा खुलासा ठाकूर यांनी केला.
‘मी वॉर्डात बऱ्याच व्यक्तींना शुद्ध पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला. आता कोरोनाचं संकट आलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमच्याजवळ सहा महिने वेळ होता. मात्र, तरीही आम्ही कामे करु शकलो नाहीत. आम्ही साधी मीटिंग घेऊ शकलो नाहीत. मी त्याअगोदरही अनेकवेळा रस्त्यांच्या कामासाठी वारंवार विषय मांडला. पण दखल घेतली नाही’, असं महेंद्र सिंग ठाकूर म्हणाले.
दरम्यान, ‘जनतेने भाजपविरोधात काम करतोय असं समजू नये. येणारा नगराध्यक्ष हा एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्याच मर्जीचा असेल. आम्ही त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवू. जनता आम्हाला शंभर टक्के आशीर्वाद देईल’, असा विश्वास नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी व्यक्त केलं.