जैन मुनी प.पू. विजय रश्मिरत्नसूरिजी यांची जैन हिल्स येथे भेट
जळगाव;- जैनत्व जागरण अभियान अंतर्गत श्वेतांबर मूर्तिपूजक जैन समाजातील तपागच्छ सूरि प्रेमभुवनभानु समुदायामधील इंडिया बुक रेकॉर्ड – एशिया बुक रेकॉर्ड धारक विश्वविक्रमी ४५१ दीक्षादानेश्वरी श्री गुणरत्न सूरीश्वरजी म.सा. यांचे शिष्यरत्न जैनाचार्य विजय रश्मिरत्नसूरिजी यांचे गुरुवारी दि. 11 रोजी जैन हिल्स येथे आगमन झाले. कंपनीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी जैन हिल्स येथील शेती संशोधन व प्रात्यक्षिक केंद्र, गांधी तीर्थ, श्रद्धाधाम येथे भेट दिली व काही भाविकांशी सुसंवाद साधला. यावेळी जैन परिवारातील सदस्यांनी जैन साधू गणांचे दर्शन घेतले.
“द अॅड्रेस ऑफ रियल हॅप्पीनेस” ह्या विषयावर जैनाचार्य विजय रश्मिरत्न सूरीश्वरजी यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, प्रत्येक व्यक्तीला सुख पाहिजे. सुख मिळविण्यासाठी मानव हा काबाडकष्ट करीत असतो, साधन सामुग्री गोळा करण्यामागे भटकत असतो व आपल्याच जीवनाचे अमूल्य क्षण घालवत असतो, परंतु सुख मिळत नाही. यावेळी आचार्यांनी सांगितले की, सुख हे साधन मध्ये नाही, तर साधना मध्ये आहे. सुख हे सामग्री मध्ये नाही, तर ते आपल्या मनात आहे. सुख भोगात नाही तर सुख त्यागात आहे. सुखाचा खरा पत्ता मिळविण्यासाठी जैनाचार्यांनी दोन मंत्र दिले, पहिला असा की ‘मुझे कुछ नही चाहिये’ आणि दुसरा ‘मेरा कोई दुश्मन नही.’ हे मंत्र दररोज १०८ वेळा याचा जाप करा, आपणास सुखाचा अनुभव येईल.
रात्रभर जैन हिल्स येथे मुक्काम करून साधू गण यांनी 12 रोजी पहाटे साडेपाच वाजता पाचोराकडे विहार केला.