अंतर्गत रचना बदल , खांदेपालट विषयी चर्चेची शक्यता ; राजकीय क्षेत्राचे लागले लक्ष
जळगाव (प्रतिनिधी) – शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत हे आज सोमवारी 5 रोजी शहरात दिवसभरामध्ये विविध बैठका घेणार आहेत. त्यामध्ये महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक, आमदार तसेच महानगरातील पदाधिकारी यांची ते स्वतंत्र भेट घेणार आहेत. तसेच या बैठकांमधून जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न संजय सावंत करणार आहेत. मात्र या बैठकांमधून शिवसेनेला फलित काय मिळेल हा खरा नेत्यांचा चिंतनाचा विषय आहे.
केसरी राज न्यूज पोर्टल व साप्ताहिकाने दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेतील शिवसेनेमध्ये खांदेपालट होतील काय याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याविषयी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये चर्चा रंगून आली होती. काहीशी असलेली अंतर्गत खदखद यामुळे बाहेर आली. मात्र दुसरीकडे भाजपबाबत नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराच्या बातम्यांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक देखील त्यांच्यासोबत जातील अशा अफवा उठल्यामुळे अखेर शिवसेनेच्या नेत्यांना संपर्कप्रमुख संजय सावंत यांना जळगावच्या दौऱ्यावर दोन दिवसीय पाठविण्यात आले. या दोन दिवसांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील शिवसेना नेते, नगरसेवक, पदाधिकारी यांची भेट घेत आहेत. या भेटींमधून शिवसेनेत काही मरगळ आली आहे का, काही वैयक्तिक हेवेदावे, नाराजी आहे का हे सर्व तपासण्याचा संजय सावंत प्रयत्न करीत आहेत. यातून ते काही गुप्त माहिती देखील मिळवत असल्याचे समजते.
सोमवारी पाच ऑक्टोबर रोजी काही वेळेतच 11 वाजता सुरू होणाऱ्या बैठकांमध्ये जी काही मांडणी नगरसेवक, आमदार आणि पदाधिकारी व कार्यकर्ते करतील त्यात संजय सावंत हे काय सूचना करतात तसेच पक्षाच्या पातळीवर वरिष्ठांकडे काय अहवाल देतात याकडे देखील राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे तसेच राजकीय क्षेत्रातील सर्व दिग्गज नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये फारसे काही घडून येईल असे दिसून येत नाही. त्यातही तीन नगरसेवक कोरोना पॉझिटिव तसेच तिन नगरसेवकांची वैयक्तिक अडचणी यामुळे अंदाजे दहा नगरसेवकांची या बैठकीला उपस्थिती राहू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.यावेळी महानगरपालिकेमध्ये खांदेपालट करावी काय याबाबत देखील चर्चा होऊ शकते असे सांगितले जात आहे. महापालिकेतील विरोधी पक्ष नेता म्हणून अडीच वर्षांचा कार्यकाळ जवळपास पूर्ण होत असल्यामुळे विरोधी पक्ष नेता म्हणून कोणाची निवड किंवा कोणाचे नावावर चर्चा होऊ शकते हे बघायला मिळणार आहे.