जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पाचोरा शहरात धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- पाचोरा येथील महावितरणच्या एका उपविभागीय अभियंत्याला तब्बल २९ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज मंगळवारी १२ रोजी रंगेहाथ पकडले आहे. सोलर प्लेटा फिटिंग च्या कामांना मंजुरी देण्यासाठी हे लाच मागण्यात आल्याचे दिसून आले. या कारवाईमुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे.
मनोज जगन्नाथ मोरे (वय ३८) असे आरोपीचे नाव असून, ३२ वर्षीय तक्रारदाराकडून त्याने एकूण ७९,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराचा सोलर फिटिंगचा व्यवसाय असून, कामांसाठी मंजुरी देण्याच्या मोबदल्यात मोरेने ही मागणी केली होती.(केसीएन)तक्रारदार यांनी एसीबीकडे ११ ऑगस्ट रोजी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तक्रारदाराच्या तीन प्रकरणांची ‘रिलीज ऑर्डर’ काढण्यासाठी प्रत्येकी ३,००० रुपये, असे एकूण ९,००० रुपये आणि यापूर्वी मंजुरी दिलेल्या २८ प्रकरणांसाठी प्रत्येकी २,५०० रुपये, असे एकूण ७०,००० रुपये मोरेने मागितले होते. एसीबीने सापळा रचून १२ऑगस्ट रोजी मोरे यांच्या कार्यालयात ही कारवाई केली.
त्यावेळी मोरेने तक्रारदाराकडून २९ हजार रुपये स्वीकारले. यात, सध्याच्या तीन कामांचे ९ हजार रुपये आणि मागील कामांच्या लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून २०,००० रुपयांचा समावेश होता. लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्यानंतर मोरे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.(केसीएन)या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर, चालक सुरेश पाटील आदींनी सहभाग घेतला.