भुसावळ रेल्वे स्थानक येथे सादरीकरण
जळगाव (प्रतिनिधी) : विनाकारण रेल्वेत साखळी ओढणारी प्रकरणे थांबविण्यासाठी (चेन पुलिंग) व अशा वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आज गुरुवारी वाणिज्य आणि कार्मिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्काऊट आणि गाईडतर्फे एक नुक्कड नाटकाचे आयोजन करण्यात आले. हे नुक्कड नाटक भुसावळ स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक ४ येथे सादर करण्यात आले. या स्काऊट आणि गाईड पथकात विविध रेल्वे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र , राजस्थान आणि दादर हवेली राज्य येथून आलेले स्काऊट आणि गाईड यांच्याद्वारे या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.
या नुक्कड नाटकात अनावश्यक चेन पुलिंगच्या परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला, जे केवळ रेल्वे सेवांमध्ये विलंबाचे कारण ठरते, तर प्रवाशांच्या सुरक्षेलाही धोका पोहोचवते. नाटकाच्या माध्यमातून चेन पुलिंग फक्त आणीबाणीच्या प्रसंगातच करावे, अशी महत्वाची सूचना प्रवाशांना दिली गेली. ट्रेनमधील एसीपीच्या कृतींचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनवर परिणाम होत नाही तर त्यामागून येणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो ज्यामुळे मेल/एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. पुढे एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी एसीपीचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते. स्काऊट आणि गाईडच्या पथकाने वास्तवात आणीबाणीच्या वेळी कोणते योग्य पाऊल उचलावे याची सखोल माहिती दिली. उपस्थित प्रवाशांनी या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि चेन पुलिंगचे गांभीर्य ओळखले.
तसेच भारत स्काऊट अँड गाईड तर्फे पर्यावरण सुरक्षेसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली भारत स्काऊट ग्राउंड येथून सुरुवात होऊन भुसावळ स्थानक येथे संपन्न करण्यात आले. यामध्ये स्वच्छ भारत सुंदर भारत आणि स्वच्छ रेल्वे सुंदर रेल्वे अशी जागरूकता प्रवाशांमध्ये करण्यात आली. भुसावळ विभागाने सर्व प्रवाशांना अलार्म चेन जबाबदारीने वापरण्याचे आवाहन केले आहे आणि वास्तविक आपत्कालीन परिस्थिती वगळता ती ओढण्यापासून परावृत्त करीत आहे. यावेळी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी बी तपस्वी, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अभय कुमार, सहाय्यक कार्मिक अधिकारी अतुल रायकवार, स्काऊट एवं गाईडचे पदाधिकारी ,स्टेशन प्रबंधक, मुख्य वाणिज्य निरीक्षक तसेच आरपीएफ स्टाफ हजर होते.