पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिला उच्चशिक्षित उमेदवार
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे मतदारसंघात चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. उच्च व सुसंस्कृत उमेदवार देण्याबाबतची मागणी पूर्ण झाल्याने मतदारसंघातील जनतेने उमेदवारीचे स्वागत केल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे दोनवेळा खासदार झालेल्या रक्षा खडसे यांनाच पुन्हा तिसऱ्यांदा तिकीट देण्यात आले आहे. मात्र भाजपच्या पक्षांतर्गत होत असलेली नाराजी पाहता रक्षा खडसे यांना यंदाची लोकसभा निवडणूक हि कठीण जाणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. दुसरीकडे रावेर येथील असलेले उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील यांनी भाजपातून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे. मतदारसंघात अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. हि विकासकामे मार्गी लागण्यासह काही नवीन प्रकल्प व योजना आणण्याविषयी श्रीराम पाटील हे सकारात्मक आहेत.
उमेदवारी मिळाल्यानंतर आता श्रीराम पाटील यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरु केल्या आहेत. रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांनी भेटी घेतल्या. निवडणुकीबाबत कसे नियोजन करता येईल याबाबत प्राथमिक नियोजन करण्यात आले. श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळणार हे ‘केसरीराज’ने प्रसिद्ध केलेले वृत्त खरे ठरले आहे. मतदारसंघातील रावेर, यावल, चोपडा, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, मलकापूर या तालुक्यात श्रीराम पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहेत.