दत्तजयंतीनिमित्त दाणा बाजारात विविध कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील दाणा बाजार परिसरातील श्री गुरुदत्त मंदिर येथे श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे मंगळवारी दत्तजयंती निमित्त दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी वातावरण भक्तिमय झालेले दिसून आले.
दाणा बाजारातील श्री गुरुदत्त मंदिर गेल्या ३४ वर्षांपासून आहे. तर अन्नदानाचा कार्यक्रम गेली ४० वर्षे नियमितपणे सुरु आहे. भव्य कळस असून मंदिराच्या शीर्षावर नवनाथ महाराजांचे रूप साकारण्यात आलेले आहे. दरवर्षी श्री गुरुदत्तांचे स्मरण करून विविध उपक्रम घेतले जातात. मंगळवारी २६ डिसेंबर रोजी दत्तजयंतीनिमित्त सुरुवातीला सकाळी परिसरात साफसफाई करण्यात आली. त्यानंतर श्री गुरुदत्ताची महापूजा महाआरती गुरुदत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. एकूण ५ ते ६ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संध्याकाळी देवीलाल व्यास यांनी श्री सत्यनारायणाची कथा सांगितली. तर रात्री संगीतमय भजन सादर झाले. यावेळी भाविकांनी भजनांच्या तालावर श्री गुरुदत्ताचे स्मरण करीत भक्तिमय वातावरण निर्माण केले. भजन हे दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या सत्संगी भजन मंडळतर्फे सादर करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अशोक पाटील, सचिव जितेंद्र पानसर, नामदेव चौधरी, मधुकर बारी, प्रकाश चौधरी, मधुकर देवरे, सीताराम देवरे, आदिनाथ काकडे, शिवाजी दळवी, मयूर चौधरी, देविदास भास्कर, बबन हरसळ, सदाशिव बादल, चंद्रकांत सावंत, ज्ञानदेव पाटील, जितेंद्र परदेशी आदींनी परिश्रम घेतले.