पक्षाला उभारी देण्यासाठी “एकनिष्ठतेची मोहीम”
जळगाव (प्रतिनिधी) – राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर आता शरद पवार गटाकडून आगामी २०२४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी २१ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेने व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी राज्यभरातील जिल्हा प्रभारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात जळगाव,धुळे, नंदुरबारसह बुलढाणाची जबाबदारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मागील महिन्यांत २ जुलै रोजी राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झाले होते. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळाले. सोबतच वित्त आणि नियोजन खातंही त्यांनी आपल्याकडे खेचून आणले आहे. दरम्यान शरद पवारांनीसुद्धा आपल्याला साथ द्यावी यासाठी ते प्रयत्न करीत असले तरी त्यांना अद्याप यश आले नाही. मात्र, असे जरी असले तरी दुसरीकडे शरद पवार गटाने आगामी २०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ३० जिल्ह्यांसाठी आपल्या गटातील नेत्यांची यादी जाहीर करून पक्ष वाढीबरोबरच निवडणुकांच्या दृष्टीने रणनिती ठरविण्यास सुरूवात केली आहे.
जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने जिल्हा प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनिल देशमुख यांच्याकडे अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, एकनाथ खडसे यांच्याकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, राजेश टोपे यांच्याकडे औरंगाबाद , परभणी, जालना, लातूर, धाराशिव तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ठाण्यासह बीडची जबाबदारी देण्यात आली आहे. बाळासाहेब पाटील यांच्याकडे सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, प्राजक्त तनपुरे यांच्याकडे नाशिक, अहमदनगर, अशोक पवार यांच्याकडे पुणे, रोहित पवार यांच्याकडे रायगड, भंडारा, गोंदिया आणि सुनिल भुसारा यांच्याकडे पालघर, हिंगोली, नांदेड, गडचिरोली या जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पक्षाला उभारी देण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात एकनिष्ठतेची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमुळे कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्यावर असलेला विश्वास स्पष्ट होणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सदस्याला ७०३०१२००१२ या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. हा मिस्ड कॉल दिल्यानंतर सदस्याला त्याच्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे एक लिंक प्राप्त होईल. या लिंकच्या माध्यमातून सदस्याला स्वतःची वैयक्तिक माहिती नोंदवायची आहे. माहिती नोंदवल्यानंतर सदर सदस्याची नोंद होऊन सदस्याचे अधिकृत डिजीटल कार्ड डाऊनलोड होईल. अशी ही एकनिष्ठतेची मोहीम गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली आहे.