अमळनेर तालुक्यातील आटाळे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात आटाळे येथे शत्रुघ्न गाजमल पाटील, भरत गजमल पाटील यांच्या शेताला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागून सात बिघे क्षेत्रातील गहू, मका, ठिबक नळ्या जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.
शत्रुघ्न गजमल पाटील आणि भरत गजमल पाटील यांच्या शेतात दीड बिघे गहू साडे पाच बिघे मकाची लागवड करण्यात आली होती, गहू आणि मक्याचे पीक जोरदार होते, भरघोस उत्पन्न येणार म्हणून दोन्ही भाऊ आनंदी होते मात्र मंगळवारी दुपारी ४ वाजता शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणगी पडून शेतातील पिकाला आग लागली. तात्काळ सरपंच आणि स्वतः शेतकऱ्यांनी अग्निशमन विभागाला कळविले. मात्र शेतात यायला रस्ता व्यवस्थित नसल्याने गाडी शेतात पोहचायला उशीर झाला. अग्निशमन गाडी आल्याने नंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. शेजारच्या विहिरीवरून अग्निशमन बंबात पाणी भरून आग विझवण्यात आली.
शेजारच्या शेतात असणाऱ्या मका पिकाला देखील याची झळ बसली असती. मात्र शेतातील आदिवासी समाजाच्या महिलांनी त्या शेतात आग पसरू दिली नाही. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश आले. वीज मंडळाच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने वीज मंडळाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी महसूल विभागासह वीज मंडळाने पंचनामा करावा अशी मागणी होत आहे.