धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील दुःखद घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मित्रांसोबत पतंग खेळत असताना विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करताना एका १५ वर्षीय तरुणाचा विजेचा जबर धक्का लागून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शनिवार दि.२५ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
लोकेश सोपान पाटील (वय १५, रा. बोरखेडा ह.मु.पाळधी ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, लहान भाऊ, काका, काकू यांच्यासह राहत होता. इम्पेरियल स्कूल येथे इयत्ता नववीचे तो शिक्षण घेत होता.(केसीएन)पाळधी येथे लोकेशचे वडील सोपान पाटील हे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. दरम्यान शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास लोकेश हा त्याच्या मित्रांसह पतंग उडवत होता.
काही वेळाने पतंग विद्युत तारांमध्ये अडकल्यामुळे त्याच्या मावशीच्या घराच्या गच्चीवर तो गेला. तेथे विद्युत तारांमध्ये अडकलेली पतंग खेचताना विजेचा जबर धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. (केसीएन)ग्रामस्थांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लोकेश पाटील याला हलवले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मनमिळावू स्वभावाचा व हसत खेळत असणारा लोकेश काही क्षणात जग सोडून गेला हे पाहून अनेकांना रुग्णालयात अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे बोरखेडा व पाळधी गावांमध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.