मुक्ताईनगर शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : घरात सुरु असलेल्या कूलरमुळे शॉक लागून नऊ वर्षीय वाढदिवसाच्या दिवशीच चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील जिजाऊ नगरात हा दुर्दैवी प्रकार घडला. वैष्णवी चेतन सनान्से असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
मुक्ताईनगर शहरातील जिजाऊ नगरात चेतन सनान्से परिवारासह वास्तव्यास आहेत. चेतन सनान्से यांचे सलून आहे. चेतन सनान्से यांची मुलगी वैष्णवीचा शुक्रवारी वाढदिवस होता. शाळेला सु्ट्टी असल्याने वैष्णवी मलकापूर येथे तिच्या मावशीकडे गेली होती. वाढदिवस असल्याने तिला शुक्रवारी मुक्ताईनगर येथे तिच्या घरी आणण्यात आले होते. वैष्णवीच्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरु होती.
वैष्णवी तिचे काका लखन सनान्से यांच्या घरी गेली होती. तिथून ती तिच्या घरी आली. घराबाहेर चप्पल काढताना तिला कूलरचा शॉक लागला. विजेच्या धक्क्याची तीव्र जास्त होती. वैष्णवी जागीच कोसळली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर वीज पुरवठा खंडित करुन वैष्णवीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैष्णवीची प्राणज्योत मालवली होती.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या आई, वडिलांसह इतर कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. वाढदिवस झाल्यानंतर शनिवारी वैष्णवी तिच्या आई वडिलांसह केदारनाथ, बद्रिनाथ येथे दर्शनासाठी जाणार होती. वैष्णवीच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वैष्णवी दुसरीत उत्तीर्ण होऊन तिसरीत गेली होती. तिच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, आजी , बाबा, काका, काकू, चुलत भावंडे असा परिवार आहे.