अहमदनगर (वृत्तसंस्था) – जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चार मुलांची विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अनिकेत अरूण बर्डै, ओंकार अरुण बर्डै, दर्शन अजित बर्डै व विराज अजित बर्डै अशी मयत चौघा भावंडांची नावं आहेत. दरम्यान, अचानक मुलांचे मृतदेह बघून आई – वडिलांनी एकच हंबरडा फोडला. त्यामुळे उपस्थितांनाही अश्रु अनावर झाले होते.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. बर्डे यांच्या वस्तीजवळच छोटेसे तळे आहे. त्या तळ्याच्या वरून वीज वाहक तारा गेलेल्या आहेत. तारा तुटून तळ्यात पडलेल्या होत्या. मात्र, मुलांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. ते सरळ पाण्यात गेल्याने त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, पावसामुळे रस्ता खराब झाला होता. त्यामुळे रुग्णावाहिका दूरवरच उभी करावी लागली. तिथपर्यंत झोळी करून मृतदेह न्यावे लागले. चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यूमुळे ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच या घटनेला वीज कंपनीला जबाबदार धरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.