चाळीसगावातून उन्मेष पाटील, पाचोरातून वैशाली सूर्यवंशी देणार लढत
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- अखेर महाविकास आघाडी मधून उमेदवारी जाहीर करण्याची आघाडी शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे. पक्षातर्फे ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदारसंघातून माजी खा. उन्मेष पाटील यांना तर पाचोरा-भडगाव मतदारसंघातून वैशाली सूर्यवंशी यांना तिकीट जाहीर झाले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी मिळाली आहे.
राज्यात भाजपने ९९ तर शिवसेना शिंदे गटाने ४५ उमेदवार जाहीर केले. त्यानंतर अजित पवार गटाने देखील ३८ तर मनसेने ४५ उमेदवार घोषित केले. मात्र महाविकास आघाडीत चर्चाच सुरु होती. आता शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले असून ६५ उमेदवार घोषित झाले आहेत.(केसीएन) यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे लढत देतील. तर आदित्य ठाकरे हे वरळी येथून लढणार असून माहीम येथे अमित राज ठाकरे, सदा सरवणकर यांच्या विरोधात महेश सावंत लढत देणार आहेत. नेवासा येथे अपक्ष आ. यशवंतराव गडाख यांनाही आता पक्षातर्फे उमेदवारी मिळाली आहे.
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव मतदारसंघातून माजी खा. उन्मेष पाटील यांना तर पाचोरा-भडगाव मतदारसंघातून वैशाली सूर्यवंशी यांना तिकीट जाहीर झाले आहे.(केसीएन)याबाबत जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्याशी “केसरीराज”ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, चाळीसगाव, पाचोरासह एरंडोल, जळगाव शहर व जळगाव ग्रामीण हे मतदारसंघदेखील शिवसेना ठाकरे गटाला मिळणार असून पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी अंतिम केली जात आहे. यात एरंडोल येथे डॉ. हर्षल माने, जळगाव ग्रामीण येथे लक्ष्मण पाटील तर जळगाव शहरात जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, कुलभूषण पाटील हे इच्छुक असल्याचे म्हटले.