मुंबई (वृत्तसंस्था) – बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे. बिहार विधानसभेचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबरला पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच प्रचारसभांची रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले अनेक पक्ष निवडणूक लढवत आहेत. राज्यात सत्तेत असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक लढवत आहे.
यातच महाराष्ट्रात एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना बिहार निवडणूक एकत्र लढणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना खुलासा केला.
संजय राऊत यांनी यापूर्वी म्हंटले होते की, बिहारमधील प्रादेशिक पक्ष हे शिवसेनेशी हातमिळवणी करण्यासाठी इच्छुक आहेत . त्या पक्षांबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येत निवडणूक लढवू शकते असे संकेतही त्यांनी दिले होते.
संजय राऊत बिहारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी हातमिळवणीबाबत म्हणाले,”पुढील आठवड्यात मी पाटणाला जाणार आहे. पप्पू यादव यांच्यासह काही स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढू इच्छित आहे. त्यांची चर्चा करण्याची इच्छा आहे. शिवसेना ४० ते ५० जागा लढवणार आहे. आतापर्यंत युती करण्यासंदर्भात कुणाशीही चर्चा झालेली नाही. ,’ असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तसेच शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्टार प्रचार यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
तर शिवसेना पक्षाच्या स्टार प्रचार यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह आणखी 20 जणांच्या नावांचा समावेश आहे.