जळगाव महापालिकेतील ४ नगरसेवकांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव महापालिकेतील ४ नगरसेवकांनी भाजपला जय श्रीराम करीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करून जय महाराष्ट्र केला आहे. यामुळे ललित कोल्हे यांची खेळी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २८ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते. शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करीत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळला होता. १० नगरसेवक पुन्हा भाजपात गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताकडे पोहचली होती.
आज शुक्रवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे यांनी पाळधी येथे शिवबंधन बांधले आहे. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, सरिता माळी, धुडकू सपकाळे, मंगेश जोहरे, गोकुळ पाटील, ऍड.दिलीप पोकळे, आशुतोष पाटील, कुंदन काळे, हर्षल मावळे आदी उपस्थित होते.