मिरवणूक, व्याख्यान, नाटिका, नृत्यांसह जागविले स्फुल्लिंग
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीसह विविध उपक्रम घेण्यात आले. प्रसंगी शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसून आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले. सुरुवातीला मुख्य प्रवेशद्वारपासून ढोलताशे, लेझीमच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पालखी पूजन करून मिरवणुकीला सुरुवात केली. यानंतर झेंडे घेऊन, पारंपरिक वेशभूषा करीत विद्यार्थ्यांनी उत्साह दाखविला. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन विद्यार्थ्यांनी जयघोष केला. मिरवणुकीनंतर स्फूर्तिदायी नृत्य व नाटिका सादर झाल्या. “शिवजन्म ते शिवराज्याभिषेक” या विषयीच्या नाटिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील पट उलगडला गेला.
यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांचे व्याख्यान झाले. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता (पदव्युत्तर) डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ. किशोर इंगोले, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील उपस्थित होते. डॉ. ठाकूर व डॉ. लेकुरवाळे यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्याविषयी माहिती देऊन त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे असे सांगितले. यावेळी सुत्रसंचलन पार्थ शेठ, शिवानी क्षीरसागर यांनी केले. आभार विद्यार्थी परिषद सचिव आदिनाथ कळणार याने मानले.
प्रसंगी डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. निशिकांत गडपायले, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड, डॉ. सुनयना कुमठेकर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सुजित भोगील, विजय गोटे, अंकुर जाधव, अनुष्का मंजे, राजसिंग छाबरा यांच्यासह तिन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.