जळगाव (प्रतिनिधी) :- नौजवान भारत युवक संघटनेच्या तरुणांनी शिवजयंतीनिमित्त तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतिदिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये व काव्यरत्नावली चौकात गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकाच्या ५०० प्रती वाटून साजरी केली.
महापुरुषांची जयंती फक्त नाचून साजरी करण्यापेक्षा ती वाचूनही साजरी करायला हवी,अशी भूमिका नौजवान भारत युवक संघटनेने ठेऊन हा उपक्रम पार पाडला. ‘शिवाजी कोण होता’ हे फक्त ७० पानांचे छोटेसे पुस्तक शिवजयंतीला विद्यापीठातील विद्यार्थ्यांना देण्यात आले. ‘महापुरुषांना डोक्यावर घेण्याआधी त्यांना डोक्यात घ्या’ या विचाराचा संघटनेने प्रसार केला. या मोहिमेमध्ये नौजवान भारत युवक संघटनेच्या सोहन बारेला, मयूर साळवे, जयेश सोळंके, शिवम सोनवणे, अमोल गोमटे, सुष्मिता भालेराव, अजय पाटील या सदस्यांनी भाग घेतला.