जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या खाली मालधक्काजवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार ३१ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. या मयताची ओळख पटली असून देवीदास श्रीपत काकडे (वय-४५) रा. केसी पार्क शिवाजीनगर, जळगाव असे त्यांचे नाव आहे.जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या खाली माल धक्क्याजवळ अप रेल्वे लाईनवर अनोळखी व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. तसेच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
मयताच्या उजव्या हातावर देविदास असे गोंदलेले नाव होते. त्यानुसार रेल्वे पोलीसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले होते.संध्याकाळी मयताच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला जाऊन देवीदास श्रीपत काकडे रा. के.सी.पार्क, शिवाजीनगर, जळगाव हे असल्याचे ओळख पटविली. ते जळगाव जिल्हा कोर्टसमोर अल्फा मेडीकलवर कामाला होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामराव इंगळे हे करीत आहे.