मालवण (वृत्तसंस्था ) सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ८ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींसह विरोधकही आक्रमक झाले होते. या घटनेनंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता.
यानंतर तब्बल 11 दिवसांनी फरार असलेल्या जयदीप आपटेला पकडण्यात पोलिसांना यश आले. यानंतर जयदीप आपटेला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. अखेर मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी जयदीप आपटेविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती. तसेच मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची पाच पथकं त्याचा कसून शोध घेत होती. मात्र जयदीप आपटे हा त्यांच्या हाती लागत नव्हता. पण बुधवारी (४ सप्टेंबर) जयदीप आपटे हा अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.