जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील एका अल्पवयीन तरुणाने नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
शनिवारी १० रोजी मानसिक स्वास्थ दिनादिवशीच अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याने वाढत्या ताणतणावाचा प्रश्न समोर आला आहे.
विपीन रामकृष्ण मोरे (भिल्ल,वय १६) रा. इंदिरा नगर, शिरसोली प्र. न. असे मृत तरुणाचे नाव आहे. सकाळपासून तो घरीच होता. तर आईवडील हे शेतात कामाला गेले होते. त्याचा मोठा भाऊ हा देखील कामाच्या निमित्त बाहेर होता. घरात एकटे असताना अचानक नैराश्यातून दुपारी २ वाजेच्या सुमारास विपीन मोरे याने घरात छताला गळफास लावून आत्महत्या केली. त्याला एकूण ४ भाऊ असून त्यापेक्षा लहान २ भाऊ गावातच होते.
त्याच्या आत्महत्येचे वृत्त कळताच कुटुंबियांनी घराकडे धाव घेतली. विपीनचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. विपिनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. एमआयडीसी पोलीसात उशिरा पर्यंत मृत्यूची नोद करण्यात येणार आहे.