उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील इसमाचा झाडाखाली बसलेला असताना अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक ७ जून रोजी संध्याकाळी ७ वाजेनंतर समोर आली आहे. सदर इसमाचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
संजय देवचंद सूर्यवंशी (वय ५२, रा. शिरसोली प्र.बो. ता. जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते शिरसोली गावामध्ये हॉटेल प्रशांतच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होते. संजय सूर्यवंशी हे शिरसोली जवळच्या एका कंपनीत हाउसकीपिंग सुपरवायझर म्हणून काम करीत होते. तर त्यांची पत्नी निर्मला या त्याच कंपनीत टिशू कल्चर विभागात कामाला आहेत. दोघेही पती-पत्नी कंपनीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. मुलगा शिक्षण घेत असून मुलगी बारामती येथे एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे.
शिरसोली गावालगत असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात कडुलिंबाच्या झाडाखाली दुपारी ते बराच वेळ बसलेले असल्याचे काही लोकांनी पाहिले आहे. संध्याकाळी याच झाडाखाली ते निपचित पडलेले ग्रामस्थांना दिसून आले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, संजय सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे शिरसोली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.