पती ताब्यात, घटना उघड करण्याचे पोलिसांसमोर खडतर आव्हान
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील राजपाल नगर येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दि. २० जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे. घटनेचा सखोल तपास करण्याचे काम एमआयडीसी पोलिसांनी सुरू केले असून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
नबाबाई भाऊलाल भिल (वय ३२) असे मयत महिलेचे नाव आहे. ती जैन व्हॅली येथे मजूरी काम करते. तिचा पती भाऊलाल पांडुरंग भिल (वय ४२) हादेखील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शिरसोली प्र.न. गावापासुन एक कीलोमीटर अंतरावर राजपाल नगर येथे रविवारी १९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजेला दाम्पत्य गावात गेले यावेळी त्यांनी फळ व खाद्यपदार्थ घेतले तसेच गावठी दारू पिऊन पती भावलाल रात्री घरी आला होता. सदर दांपत्याला सहा मुली व एक मुलगा आहे. हे सर्व त्याच्या आईकडे म्हणजेच मुले तेजाबाई भिल्ल
आजीकडे गेली होती. त्यामुळे घरामध्ये पती-पत्नी दोघेही होते.
रात्री या दोघांमध्ये वाद झाले का किंवा कसे याबाबत नशेमध्ये असल्याने त्याला काही सांगता आले नाही. रात्री साधारण ११ ते २ च्या दरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे. महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत नाही. तसेच तिने आत्महत्या केली का असेही प्रथमदर्शनी पोलिसांना दिसत नाही. याबाबत पतीला पोलिसांनी विचारणा केली असता त्याने सांगितले की, तो बाहेर खाटीवर अंगणात झोपला होता. महिला स्वयंपाक घरात निपचित पडलेली होती. दारू पिलेला असल्याने रात्री काय झाले मला सांगता येत नाही.
पहाटे साडे तीन वाजता जाग आली तेव्हा स्वयंपाक घरात पत्नीला निपचित पडलेली पाहताच संशय आला. लगेच शेजारी जाऊन शेजारील लोकांना याबाबत माहिती दिल्याचे पतीने पोलिसांना सांगितले आहे. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळविले. या ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, एपीआय अमोल मोरे ,पीएसआय दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी हे. काँ. रतीलाल पवार, सचिन मुडे ,जितेंद्र राठो,शूदधोन ढवळे यांनी घटनेची माहिती घेतली. सदर महिलेचे माहेर पाल ता.रावेर हे आहे.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सकाळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. फिनाईल, हातातील बांगड्या, फुटलेला आरसा आदी संशयास्पद वस्तू घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याठिकाणी पाठविण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे सात मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.