शिक्षणाधिकारी गोत्यात येण्याची शक्यता ; आ. चव्हाण यांनी केली होती मध्यस्थी

जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील ३ शिक्षकांच्या बदली प्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी साडेचार लाख रुपये घेतल्याप्रकरणी प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांना चौकशी करण्याचे आदेश आज 30 रोजी दिले आहेत.
रवींद्र हिम्मतराव शिंदे यांनी ६ ऑगस्ट २०२० रोजी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. चाळीसगाव तालुक्यातील ३ शिक्षकांना इच्छुक ठिकाणी बदली करण्याकामी प्रत्येकी दीड लाख रुपये असे साडेचार लाख रुपये घेतले होते. त्यातही बदली न झाल्याने तिन्ही शिक्षकांनी आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती. आ. मंगेश चव्हाण यांनी मध्यस्थी करून तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे पैसे परत केल्याचे रवींद्र शिंदे यांनी निवेदनात म्हटले होते.
याप्रकरणी तक्रारदाराने वृत्तपत्रांची कात्रणे देखील जोडली आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्याची व प्रशासकीय यंत्रणेची नाहक बदनामी झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे शिक्षण संचालकांनी निवेदनात उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारावर योग्य ती कार्यवाही करून तक्रारदाराला कळवावे असे म्हटले आहे. दरम्यान, शिक्षण संचालक द.गो.जगताप यांनी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, शिक्षक बदलीप्रकरणी लाच घेतल्याची माहिती निवेदनाद्वारे आली आहे. त्याची चौकशी करण्यासाठी सीईओ यांना आदेश दिले आहेत.
दरम्यान, यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणी आ. मंगेश चव्हाण यांनी मध्यस्थी केली होती.







