अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : शिक्षक दाम्पत्याचे मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेले ७० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना ३ मार्च रोजी दुपारी अण्णाभाऊ साठे चौकात अरिहंत मेडिकल समोर घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढेकू रोडवरील जिजाऊ नगर येथील रहिवासी व जी. एस. हायस्कूल मधील शिक्षक निखिल रत्नाकर पाटील यांची पत्नी सेंट मेरी शाळेच्या शिक्षिका पल्लवी पाटील यांना घरगुती कामासाठी पैसे लागणार होते. त्यासाठी निखिल पाटील जेडीसीसी बँकेत २० हजार रुपये काढायला गेले तर पल्लवी पाटील बडोदा बँकेत ५० हजार रुपये काढायला गेले. दोघांनी बँकेतून पैसे काढल्या नंतर त्यांनी ते पैसे व बँकेचे पासबुक पल्लवी पाटील यांच्या पर्स मध्ये ठेवून ते मोटरसायकल क्रमांक (एम एच १९ एच २३००)च्या डिक्कीत ठेवले.
अण्णाभाऊ साठे चौकात आल्यानंतर मोटरसायकल बाहेर लावून ते मेडिकल दुकानावर गेले औषधी घेऊन परत आल्यावर त्यांना डिक्की उघडी आणि पर्स व पैसे गायब झाल्याचे दिसले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार करीत आहेत.