जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील समता नगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत २२ महिने डांबुन ठेवत अत्याचार करणाऱ्या नराधमाला जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि ७४ हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.
समता नगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना १६ डिसेंबर २०१९ रोजी घडली होती. मुलीला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तब्बल २२ महिने डांबून ठेवत तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गोलू रामसिंग राठोड (वय-२१) रा. धनवाडा ता. खिडकीया जि.हरदा मध्यप्रदेश ह.मु. समता नगर जळगाव या संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधिश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या गुन्ह्यात एकुण ११ साक्षिदार तपासण्यात आले. यात अल्पवयीन मुलगी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.
साक्षी पुरव्याअंती आरोपी गोलू रामसिंग राठोड याला दोषी ठरविण्यात आले. त्याला विविध कलमान्वये २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि एकुण ७४ हजाराचा दंडांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. चारूलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. ॲड. शारदा सोनवणे व पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.