चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील चहार्डी शिवारातील शेतात विनापरवाना अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत सुमारे ९ लाख ४० हजार रुपये आहे. याबाबत शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चहार्डी गावातील गट क्र. ९०३ या शेतात शेकडो ब्रास वाळूचा अवैध साठा असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे मिळाल्याने त्यांनी चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चोपडा येथील महसूल पथक नायब तहसीलदार सचिन बांबळे, मंडळ अधिकारी रवींद्र बेलदार, तलाठी मुकेश देसले, पंकज बाविस्कर, गजानन पाटील, कुलदीप पाटील यांनी दि.९ रोजी दुपारी घटनास्थळी भेट देत सुमारे २०० ब्रास रेतीचा अवैध विना परवाना साठा जप्त केला.
याप्रकरणी कुठलीही शासकीय परवानगी न घेता अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक व साठा करून चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी शेतमालक गणेश रमेश पाटील व इतरांविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३ (२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.