यावल तालुक्यातील दहिगाव येथील घटना
यावल (प्रतिनिधी) :- गावात साप दिसल्यावर त्याला पकडण्याचा प्रयत्न शेतमजुराने केला. मात्र साप पकडण्याचे कुठलेही प्रशिक्षण नसल्याने सापाला पकडत असताना मजुराला सर्पदंश झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील दहिगाव येथे घडली आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिलीप मोतीराम पाटील (वय ४५) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. यावल तालुक्यातील दहिगाव येथे शेतमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दिलीप पाटील हे दत्तनगर शेजारील मोकळ्या आवारात मका भरण्यासाठी गेलेले होते. दरम्यान दुपारच्या सुमारास विश्रांतीसाठी ते जवळच्या श्री स्वामी समर्थ बैठक हॉलमध्ये बसले होते. याचवेळी त्यांना साप दिसला.
कुठलेही प्रशिक्षण नसताना सापाला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र सापाने उलटी फेरी मारून त्यांना दंश केला. यामुळे दिलीप पाटील हे खाली कोसळले. त्यांना आजूबाजूच्या ग्रामस्थांनी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.(केसीएन) रुग्णालयात उपचार सुरु असताना दिलीप पाटील यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. घटनेबद्दल यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.