जामनेर तालुक्यातील सवतखेडा येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सवतखेडा येथील शेतमजुराने मंगळवार दि. १९ मार्च रोजी दुपारी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. त्यांच्या लहान मुलांनी घटना पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला आहे. दरम्यान, आर्थिक कारणाने त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता ग्रामस्थांनी सांगितली. याप्रकरणी नेरी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
एकनाथ दगडू कोळी (वय ४०, रा. सवतखेडा ता. जामनेर) असे मयत शेतमजुराचे नाव आहे. ते गावात पत्नी, ३ मुली, २ मुले यांच्यासह राहत होते. शेतमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी गावात सप्ताहाची गावपंगत होती. तेथे एकनाथ कोळी यांची पत्नी आणि मुले गेली होती. एकनाथ कोळी हे घरात एकटेच होते. त्यावेळी दुपारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने त्यांची ७ ते ८ वर्षांची दोन मुले घरी आली तेव्हा हा प्रकार उघड झाला.
मुलांनी आजूबाजूला शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर एकनाथ कोळी यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. प्रसंगी ग्रामस्थांनी जळगाव रुग्णालयात गर्दी केली होती. याप्रकरणी नेरी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.