जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा जळगावात शुभारंभ
जळगाव (प्रतिनिधी) : येथे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा जळगावात शुभारंभ करण्यात आला. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने कार्यक्रमाचा शुभारंभ दि. १५ एप्रिल रोजी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रशासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पाण्याची योग्य योजना व व्यवस्थापन कसे पोहोचवता येईल, यासाठी नियोजन करावे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अधीक्षक अभियंता य.का. भदाणे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन कसे करावे आणि सुरुवातीपासूनच विशेष मोहीम हाती घेऊन लोकाभिमुख कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतील. महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५” कार्यक्रमाचा जळगाव येथे शुभारंभ झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासन राज्याला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी कटिबद्ध आहे. शेती, उद्योग आणि वाढत्या नागरीकरणासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या हक्काचे पाणी योग्य प्रकारे वापरण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांना अधिक सक्षम करून नदीजोड प्रकल्पांची अंमलबजावणी आणि उपलब्ध पाण्याचा चांगल्या पद्धतीने वापर करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” उपक्रम राबविण्यात येत आहे. महामंडळांचे सक्षमीकरण, शेतकरी संवाद व तक्रार निवारण, पाण्याची बचत करून सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर आणि जनजागृती हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रशासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पाण्याची योग्य योजना व व्यवस्थापन कसे पोहोचवता येईल, यासाठी नियोजन करावे. त्यांनी ई-ऑफिस प्रणालीचा वापर महसूल विभागात प्रभावीपणे होत असल्याचे नमूद केले आणि इतर सर्व विभागांनी व अधिकारी कर्मचाऱ्यांनीही याच पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले. तसेच, भूसंपादन व पुनर्वसन संबंधित अडचणी सोडवण्यासाठी महसूल यंत्रणा नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष पाटील यांनी पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी कालवा स्वच्छता आणि सिंचन व्यवस्थापनातील अडचणी निदर्शनास आणून दिल्या. या अडचणींचे निराकरण करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची विनंती त्यांनी केली. कार्यकारी संचालक ज.द. बोरकर यांनी जलसंपदा विभागाकडील प्रकल्पांची कामे महसूल विभाग, पर्यावरण विभाग, कृषी विभाग, वन विभाग आणि केंद्रीय जल आयोग अशा विविध विभागांच्या समन्वयाने आणि मान्यतेनंतर केली जातात, त्यामुळे प्रकल्पांना पूर्ण होण्यास वेळ लागतो, असे सांगितले. तरीही, महामंडळांतर्गत प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांची कामे पुढील ४ वर्षात पूर्ण करून सुमारे १.०५ लक्ष हेक्टर आर जमिनीला सिंचनाचा लाभ होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कृती पंधरवड्यात महामंडळाच्या सर्व विभागांनी लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी यांत्रिकी विभागाच्या मदतीने कालवा स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमाला ज.द. बोरकर, कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगावचे अधीक्षक अभियंता यशवंतराव भदाणे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव संतोष भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांवरील पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.