जळगाव एलसीबीची कारवाई, पाचोरा तालुक्यात दिलासा
जळगाव (प्रतिनिधी) : शेतातील पाण्याच्या मोटार चोरी करणाऱ्या तरुणांसह दोन साथीदारांना पकडण्यात जळगाव एलसीबीच्या पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार हस्तगत करण्यासह चोरीच्या चार दुचाकींचादेखील या तपासात शोध लागला आहे.
पाचोरा तालुक्यातील पिंपरी व परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटार एकापाठोपाठ चोरी होत होत्या. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता. याविषयी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान या चोरी सचिन बापूराव पाटील (२९, रा. पिंपरी, ता. पाचोरा) करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी)मिळाली. पोउनि शेखर डोमाळे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक रणजित जाधव, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, भारत पाटील यांनी चोरट्यांकडून ४ चोरीच्या दुचाकीही जप्त केल्या आहेत.
संशयित सचिन हा घरी आल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता या चोरी त्याने संशयित भगवान लक्ष्मण पाटील व राहुल त्र्यंबक पाटील (दोन्ही रा. पिंपरी, ता. पाचोरा) यांच्या सोबत केल्याची माहिती दिली. त्यावरून दोघांनाही अटक करण्यात आली. संशयितांकडून पाण्याच्या १७ मोटार जप्त करण्यात आल्या. तपासात सचिन पाटील व भगवान पाटील यांनी दुचाकीदेखील चोरी केल्याची माहिती समोर आली. त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. सचिन पाटील याच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहे.