पाचोऱ्याच्या सभेवेळी घडली घटना
पाचोरा (प्रतिनिधी) – पोलिसांनी आपल्यावर चुकीची कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे म्हणणे मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पित्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे पाचोऱ्यातील सभेत शेतकऱ्याविषयी चर्चा होती.
बैल जोडी विकत घेऊन निघालो असताना पोलीस पथकाने आमच्यावर चुकीची कारवाई केली. याबाबत मुख्यमंत्र्यांसमोर म्हणणे मांडू द्यावी, असे बॕनर लाऊन पाचोरा येथे सभास्थळी पिंपळगाव हरेश्वर येथील येथील गणेश बडगुजर आले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यांना वडीलांसह ताब्यात घेतले. पाचोरा येथे मंगळवारी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. तिथे हा शेतकरी आला होता.
या शेतकऱ्याने सांगितले की, आपण बैलजोडी विकत घेऊन निघालो होतो, जरंडी या ठिकाणी पोलीस पथकाने आपल्यावर चुकीची कारवाई केली. याबाबत गुन्हा नोंदवला असल्याची तक्रार केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब यावी म्हणून स्वतःच्या गळ्यात…. साहेब मी शेतकरी बोलतोय… मला बोलायचे आहे…. अशा आशयाचे बॅनर लावले. बैलांच्या पाठीवर देखील मुख्यमंत्री साहेब मी कोणाच्या फॅक्टरीत तयार होतो का?,अशा आशयाचे बॅनर होते. ही बैलजोडी आणि शेतकरी पिता-पुत्र सभास्थानी दाखल होत असताना पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. परंतु आपणास आत जाऊ देण्यात यावे आणि मुख्यमंत्र्यांसमोर कैफियत मांडू द्यावी, असा आग्रह गणेश बडगुजर यांनी धरला, त्यामुळे सभास्थानाजवळच काही वेळ गोंधळ उडाला. पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले.